22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयश्रीलंका, मॉरिशसमध्येही आता ‘यूपीआय’!

श्रीलंका, मॉरिशसमध्येही आता ‘यूपीआय’!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते यूपीआय लॉन्च व्हर्च्युअल मीटिंगमध्ये रु पे कार्डचेही उद्घाटन

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून डिजिटल इंडियाचा जगभरात डंका वाजत आहे. भारतात तयार झालेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची(यूपीआय) व्याप्तीही सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रान्समध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता आता श्रीलंका आणि मॉरिशसमध्येही यूपीआय लॉन्च झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल मीटिंगमध्ये श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय आणि रु पे कार्ड सेवा लॉन्च केली. यावेळी मोदींसह मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हेदेखील उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हिंद महासागरातील तीन मैत्रीपूर्ण देशांसाठी आजचा दिवस खास आहे. आज आपण आपले ऐतिहासिक संबंध आधुनिक डिजिटल पद्धतीने जोडत आहोत. हा विकासासाठी आमच्या बांधिलकीचा पुरावा आहे. फिनटेक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून केवळ सीमापार व्यवहारच नव्हे, तर सीमापार संपर्कही मजबूत होतील.

नाते आणखी मजबूत
श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे म्हणाले, हजारो वर्षांपासून आपल्या दोन देशांमध्ये व्यवहार होत आला. आता नवीन पद्धतीने हा पुढे जाईल. आज आपले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आणखी दृध होतील. तर, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ म्हणतात, या निमित्ताने तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यात शतकानुशतके जुने मजबूत सांस्कृतिक, व्यावसायिक संबंध आहेत. आज हे नाते आणखी मजबूत होत आहे.

मॉरिशसमध्ये रु पे कार्ड लॉन्च होणार
भारत सरकारने ११ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय प्रणाली सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होईल आणि या देशांशी डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढेल. यामुळे भारतीय पर्यटकांना या देशांना भेटी देताना पैसे भरताना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्या देशांतील नागरिकांना भारतात आल्यावरही पैशांचे व्यवहार करणे सोपे होईल. यूपीआय व्यतिरिक्त, रुपेकार्ड सेवा मॉरिशसमध्ये सुरू केली जाईल.

यूपीआयची व्याप्ती वाढतेय
गेल्या काही वर्षांपासून, भारतीय अधिकारी जागतिक स्तरावर भारतीय चलन रुपया आणि त्याच्या पेमेंट सिस्टमच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. रिझर्व्ह बँकेने जुलै २०२२ मध्ये या संदर्भात एक यंत्रणा स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती ज्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यवहार रुपयांमध्ये करता येतील. जुलै २०२२ मध्ये, भारताने यूपीआयला यूएईच्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी एक सामंजस्य करार केला. त्याआधी फेब्रुवारीमध्ये भारत आणि सिंगापूर यांच्यात यूपीआय आणि सिंगापूरची फास्ट पेमेंट सिस्टम पे नाऊला जोडण्यासाठी करार करण्यात आला होता. याशिवाय वढक द्वारे पेमेंट लागू करण्यासाठी इंडोनेशिया, लॅटिन अमेरिकन आणि आफ्रिकन देशांशीही चर्चा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR