मुंबई : मानखुर्द – शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून आलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबाशी संबंधित वक्तव्यावरून वादंग अजूनही सुरूच आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी देखील त्याचे पडसाद दिसले. मंगळवारी सकाळी सभागृह सुरू होताच सत्ताधा-यांनी अबू आझमींच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घातला. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासोबतच त्यांना निलंबित करण्याचा आग्रहही धरला जात आहे.
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी यांनी मोगल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करताना म्हटले की, ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबाने त्याच्या कारकीर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिडि़या’ होता. त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले. तो न्यायप्रेमी सम्राट होता. आम्हाला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असे म्हटले होते. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते. औरंगजेबाची कबर खोदण्याची भाषा करणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत,’ असा आरोप अबू आझमी यांनी केला.
औरंगजेबावरून अबू आझमी यांनी केलेल्या याच वक्तव्यावरून आज विधानसभा सुरू होताच सत्ताधारी पक्षाने चांगलाच गदारोळ घालण्यास सुरुवात केली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. तर शिवसेना आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील ज्या औरंगजेबाने हिंदूंचे धर्मांतर केले, मंदिरे तोडली, महिलांना बाटवले.. अशा माणसाला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. हे कायद्याचे सभागृह आहे, आझमींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली.
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आपल्या बापाला तुरुंगात टाकणा-या औरंगजेबाचे उदात्तीकरण होत आहे. त्यामुळे आजचा हा मुहूर्त साधत औरंग्याची कबर तोडण्याचा निर्णय व्हायला हवा. ज्याने जिझिया कर लादला, हिंदू महिलांवर अत्याचार केले, अशा औरंगजेबाचे केवळ मतांसाठी तुष्टीकरण होत असेल तर अशा विचारांचे तुकडे-तुकडे करायला हवेत. यासाठी अबू आझमी यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.