33.3 C
Latur
Friday, March 21, 2025
Homeमहाराष्ट्रविधीमंडळात गदारोळ

विधीमंडळात गदारोळ

दिशा सालियन आत्महत्या प्रकरण आदित्य ठाकरेंवर पुन्हा आरोप, अटक करून चौकशी करण्याची मागणी दोषींवर कारवाई होईल : कदम

मुंबई : प्रतिनिधी
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावरून महायुतीने आज पुन्हा आदित्य ठाकरेंना टार्गेट केले. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत माजी मंर्त्यांवर आरोप केले असून त्यांना अटक करून चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी भाजप व शिंदेसेनेच्या सदस्यांनी आज विधानसभेत लावून धरली. यामुळे गदारोळ होऊन काही काळासाठी कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असून उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांची चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पाय-यांवर महायुतीच्या आमदारांनी आंदोलन केले. त्यानंतर शून्य प्रहरात विधानसभेत भाजपाच्या अमित साटम यांनी हा विषय उपस्थित केला.

दिशा सालियनच्या वडिलांनी बलात्कार करुन दिशाचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. मविआ सरकारच्या काळात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असे दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यावेळी मुंबईच्या महापौर दिशाच्या आई-वडिलांना भेटल्या, त्यांनी त्यांची दिशाभूल केली. त्यांनी आपल्याला प्रसारमाध्यमांसमोर येण्यापासून रोखले असे दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर दडपण आणण्यात आले. त्यामुळे आपण या गोष्टी समोर आणू शकलो नाही, असे दिशाचे वडिलांचे म्हणणे आहे. त्यावेळी शासनात मंत्री असलेल्या व्यक्तीचा यात सहभाग असल्याचा संशय दिशा सालियनच्या वडिलांना आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी डिसेंबर २०२२ मध्ये एसआयटी नेमण्यात आली होती, त्यांनी काय चौकशी केली, काय निष्कर्ष समोर आला? दिशा सालियनच्या वडिलांनी चार मित्र, तत्कालीन मंत्री आणि मुंबईच्या महापौरांचे नाव घेतले. एसआयटी त्यांची चौकशी करणार आहे का? ही चौकशी किती दिवसांत पूर्ण होणार, अशी प्रश्नांची सरबत्ती अमित साटम यांनी केली. मंत्री नितेश राणे व शिवसेनेच्या शिंदे गटाचे ज्येष्ठ सदस्य अर्जुन खोतकर यांनीही हा मुद्दा उचलून धरला. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार अशाप्रकरणात ज्या संबंधित व्यक्तीवर आरोप होतो, त्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी करावी लागते.

काल सतीश सालियन यांनी मविआच्या काळातील मंर्त्यावर आरोप केले. त्यामुळे त्या नेत्याला सामान्य व्यक्तीप्रमाणे न्याय लावावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. नितेश राणे यांच्या या मागणीला शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी समर्थन दिले. नितेश राणे म्हणतात त्याप्रकारे सामान्य माणसाला जो न्याय लागतो, तोच नियम माजी मंर्त्याला लावला पाहिजे, असे शंभुराज देसाई यांनी म्हणाले.

हा विषय उपस्थित झाला तेव्हा ठाकरे गटाचे कोणीही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते. आघाडीच्या अन्य सदस्यांनीही फारसा प्रतिवाद केला नाही. पण सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्षांसमोरील जागेत येऊन घोषणाबाजी केल्याने गदारोळ झाला व दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले. यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकाची (एसआयटी) चौकशी अजूनही सुरू आहे आणि त्याचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही.

एसआयटी चौकशी जलदगतीने पूर्ण केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले. पीडितेच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकार देखील या प्रकरणात पक्षकार आहे. म्हणून आम्ही न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुढील कारवाई करू. कायदा सर्वांसाठी समान आहे, कोणालाही सोडले जाणार नाही, असे कदम यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR