शांघाय : ५० वर्षांत पहिल्यांदाच अमेरिका आणि चीनमध्ये अण्वस्त्रांवर चर्चा झाली. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, हे संभाषण यावर्षी मार्चमध्ये होणार होते, परंतु आता दोन्ही देशांचे अधिकारी एकत्र बसले आहेत. दोन अमेरिकन अधिका-यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली. चर्चेदरम्यान चिनी अधिका-यांनी अमेरिकन अधिका-यांना सांगितले की, जर चीन आणि तैवानमध्ये युद्ध झाले तर चीन अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. चर्चेदरम्यान चिनी अधिका-यांनी अमेरिकन अधिका-यांना आश्वासन दिले की, दोन्ही देशांमधील युद्धात चीनचा पराभव झाला तरी तो अण्वस्त्रांचा वापर करणार नाही.
या बैठकीचा एक भाग असलेले अमेरिकन अधिकारी डेव्हिड सँटोरो यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. चिनी अधिका-यांना विश्वास आहे की ते अण्वस्त्रांचा वापर न करता तैवानला पराभूत करू शकतात. इकडे तैवानने चीनचे हे आश्वासन मान्य करण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शांघायमध्ये दोन दिवस ही बैठक झाली, ज्यामध्ये अमेरिकेच्या अर्धा डझन प्रतिनिधींनी चीनसमोर आपली बाजू मांडली. त्यात माजी अधिकारी आणि अभ्यासकांचा समावेश होता. चीनच्या बाजूने माजी लष्करी अधिकारी, अभ्यासक आणि विश्लेषकांचे शिष्टमंडळ यात सहभागी झाले होते.
अधिकृत चर्चा लवकरच
अमेरिकन अधिका-याने सांगितले की, ही चर्चा अधिकृत चर्चेची जागा घेऊ शकत नाही. दोन्ही देशांमधील चर्चा अशा वेळी घडली जेव्हा त्यांच्यात आर्थिक आणि भू-राजकारणावरून तणाव होता, ज्यामध्ये दोघांनी एकमेकांवर भेदभावपूर्ण वागण्याचा आरोप केला.