वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉरसंदर्भात आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रम्प यांना परदेशी वस्तुंच्या आयातीवर मोठा कर लादण्याचा अधिकार नाही, या संघीय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका डोनाल्ड प्रशासनाने दाखल केली. या याचिकेत ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या मोठ्या टॅरिफचे समर्थन केले.
ट्रम्प प्रशासनाने या याचिकेवर युक्तिवाद केला की, युक्रेन-रशियातील युद्धासंदर्भात आधीच उफाळलेल्या राष्ट्रीय आणीबाणीला तोंड देण्यासाठी, युद्धग्रस्त देशात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून आम्ही कर लादले आहेत. राष्ट्रपतींनी अलीकडेच रशियन ऊर्जा उत्पादने खरेदी करण्यासाठी भारताविरुद्ध वाढीव शुल्क लादण्यास मान्यता दिली, असेही याचिकेत म्हटले आहे.
टॅरिफसह अमेरिका एक श्रीमंत राष्ट्र आहे आणि शुल्काशिवाय तो एक गरीब राष्ट्र आहे, असेही समर्थन करण्यात आले. २७ ऑगस्टला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतावरील कर दुप्पट करून ५० टक्के केला. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले आहे.