डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका होत आहे. रेस्क्यू ऑपरेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, कोसळलेल्या सिल्कियारा बोगद्याच्या प्रवेशद्वारावर ४१ रुग्णवाहिका स्टँडबायवर आहेत. कामगारांना वैद्यकीय सुविधा पोहचवण्यासाठी त्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जलद आणि संघटित प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर सुद्धा तयार करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या कामगारांना बोगद्यापासून ३० किमी अंतरावर असलेल्या चिन्यालिसौर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये त्वरीत नेले जाऊ शकते. तसेच ४१ ऑक्सिजन-सुसज्ज बेडसह एक वॉर्ड देखील तयार करण्यात आला आहे, जो प्रत्येक कर्मचाऱ्याला त्वरित वैद्यकीय सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
बोगद्याकडे जाणारा रस्ता जो गेल्या दोन आठवड्यांपासून सतत जड वाहनांच्या वाहतुकीमुळे खराब (खडबडीत) आहे, रुग्णवाहिकांना कोणतीही अडचण होऊ नये आणि त्यांची अखंडित हालचाल सुरु राहावी यासाठी मातीचा नवीन थर टाकून त्याची दुरुस्ती केली जात आहे. कामगार बाहेर पडल्यानंतर इव्हॅक्युएशन प्रोटोकॉलची त्वरीत अंमलबजावणी करण्यासाठी बोगद्याच्या परिमितीवर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी सांगितले की, अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.