19 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeराष्ट्रीयव-हाडाच्या वाहनाला ट्रकची धडक; वधू-वरांसह ५ जणांचा जागीच मृत्यू

व-हाडाच्या वाहनाला ट्रकची धडक; वधू-वरांसह ५ जणांचा जागीच मृत्यू

छत्तीसगड : छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. लग्नावरून परतणा-या कारला ट्रकने धडक दिली, यात वधू-वरांसह पाच जणांचा मृत्यू झाला. गाडी रामगडहून अकलता-याच्या दिशेने जात होती. ही घटना मुलमुला पोलिस ठाण्याच्या पकारिया जंगलात घडली. स्थानिक लोकांनी आपत्कालीन सेवा डायल ११२ ला अपघाताची माहिती दिली.

पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि उपस्थित लोकांच्या मदतीने अपघातग्रस्त झालेली कार बाहेर काढली. डायल ११२ रुग्णवाहिकेने त्यांना रामगड सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, जिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक एका लग्नात सहभागी होऊन बालोदा येथे परतत होते. ट्रक चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

या भीषण अपघाताचे वृत्त समजताच वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण शोकात बदलले. जिथे कालपर्यंत शहनाईचा गूंज आणि नातेवाईकांची धांदल होती तिथे काही तासातच शांतता पसरली. बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांनी शनिवारी रात्रीच लग्न केले. शुभम रविवारी सकाळी वधूचे दर्शन घेऊन कारने घरी परतत होता. कारमध्ये वधू-वरांव्यतिरिक्त कुटुंबातील आणखी तीन सदस्य बसले होते.

पहाटे पाचच्या सुमारास पकारिया जंगलातील चंडीदेवी मंदिराजवळ समोरून भरधाव वेगाने येणा-या ट्रकने कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. धडकेचा आवाज ऐकून लोकांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यांनी सर्वांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेले. सर्व जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR