सोलापूर : सन २०२०-२१ च्या संचमान्यतेनुसार समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांना हजर करून घ्या, असे पत्र प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी काढले आहे. हजर करून न घेतल्यास खासगी प्राथमिक शाळांमधील अनुदानित रिक्त पदे रद्द करण्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला.
जिल्ह्यातील खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे सन २०२०-२१ च्या सेवक संचानुसार खासगी प्राथमिक शाळेत समायोजन करण्यात आले होते. समायोजन केलेले शिक्षक समायोजनेच्या शाळेवर हजर होणे अपेक्षित होते; मात्र संस्थेकडून विरोध झाल्यामुळे ते शिक्षक मूळ शाळेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी समायोजन झालेल्या शिक्षकांना हजर करून घेण्यासाठी पत्र काढले आहे.
समायोजन करूनही जे शिक्षक शाळेत हजर झाले नाहीत किंवा शाळेने हजर करून घेतले नाही, अशा शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापकांनी पाठवावी. तसेच हजर होण्यासाठी आलेल्या शिक्षकांना शाळेवर हजर करून घ्यावे, असे आदेश मुख्याध्यापकांना दिले आहेत.अतिरिक्त झालेल्या ज्या शिक्षकांचे आक्षेप होते, त्यांची सुनावणी घेऊन अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी अंतिम केली आहे. त्या शिक्षकांना हजर करून घ्यावे, असे पत्र खासगी प्राथमिक शाळांना काढले आहे.असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगीतले
ा