मुंबई : प्रतिनिधी
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी मी स्वत: पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. वैष्णवी हगवणेचे बाळ आता तिच्या वडिलांकडे पोहोचलेले आहे. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाची योग्यरितीने चौकशी करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरण हे अतिशय दुर्देवी असून मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैष्णवीचे बाळ स्वत:कडेच ठेवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र मी स्वत: पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना यात हस्तक्षेप करण्यास सांगितले. आता हे बाळ वैष्णवीच्या वडिलांच्या घरी पोहोचविण्यात आले आहे. वैष्णवीच्या अंगावर ज्या प्रकारे मारहाणीचे वळ होते, तिच्या ऑडिओ क्लिप्स तसेच वैष्णवीच्या घरच्यांनी दिलेली माहिती या आधारावर चौकशी करण्यात येईल.
धुळे प्रकरणाची एसआयटी चौकशी
धुळे शासकीय विश्रामगÞहात सापडलेल्या रोकड प्रकरणाची सत्यता अजून समजलेली नाही. त्याची सत्यता बाहेर आली पाहिजे कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभे राहणे हे कदापि सहन करू शकत नाही. विधानमंडळाचा आपला एक मान आहे दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे असे सांगतानाच संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कोणी दोषी आहे, कोणी पैसे मागितले का याचा छडा लावण्यात येईल विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती यांना देखील विनंती करून त्यांनी स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी नेमून चौकशी करावी. विधानमंडळाची कोणत्याही परिस्थिती बदनामी सहन होणार नाही असेही ते म्हणाले.
ज्योती मल्होत्रा प्रकरण
ज्योती मल्होत्राने मुंबईत कुठे कुठे येउन रेकी केली हे दिसून आले आहे. त्यात इतर कोण आहेत त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. व्हाईट कॉलर बनून कसा देशद्रोह करण्यात येतो हे यातून दिसून आले आहे. देशद्रोहयांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.