मुंबई : प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे-कस्पटेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कस्पटे कुटुंबियांना आश्वस्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांच्याशी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या दु:खात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या आणि सांत्वन केले.
वैष्णवीच्या दुर्देवी मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांच्याशी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधला. मंत्री गिरीश महाजन हे कस्पटेंच्या निवासस्थानी हजर होते. त्यांनी हा संवाद करवून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणेझ्रकस्पटे यांचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या दु:खात सहभागी होत सहवेदना व्यक्त केल्या आणि सांत्वन केले.
वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच या हृदयद्रावक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केले. या कठीण काळात संपूर्ण प्रशासन आणि राज्य सरकार कस्पटे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शुक्रवारी संध्याकाळी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी देखील शनिवारी कस्पटे कुटुंबियांची भेट घेउन सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून या प्रकरणी अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना सांगून त्यांनीच वैष्णवीचे बाळ तिच्या आई-वडिलांना सोपविण्यास सांगितले होते.