मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राज्य सरकारच्या आदेशावरून सीआयडी चौकशी सुरू आहे. खंडणी प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरू असतानाच वाल्मिक कराड फरार झाले आहेत. या प्रकरणात सीआयडी आणि पोलिस वाल्मिक कराड यांचा शोध घेत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांची पत्नी अंजली कराड यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. सीआयडीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. हत्या प्रकरणात राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला असून सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांची या प्रकरणात मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून अजूनही कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची टीका पटोले यांनी केली आहे.