बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराड याच्यासह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. जुन्या रागातून बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने ही मारहाण केल्याचे आमदार धस यांनी सांगितले आहे. तुरुंगात आरोपींना मारहाण झाल्याचा दावा करण्यात आल्याने पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणा-या वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कैद्यांना नाष्टा दिला जात होता. त्यावेळी वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेवर हल्ला झाला. याच कारागृहात शिक्षा भोगणा-या महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला या सर्वांमध्ये काही मुद्यांवरून बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
आमदार सुरेश धस यांनी याबाबत बोलताना सांगितले की परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांचा दावा आहे. याच रागातून महादेव गित्ते याने आता तुरुंगात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचे मला कळाले अशी माहिती धस यांनी दिली.
गित्ते-कराडमध्ये जुने वैर
जोपर्यंत बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ वाल्मीक कराडने घेतली होती आणि जोपर्यंत कराडचा खून करत नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही असा निश्चय बबन गित्तेने केला होता असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे.
काय आहे बापू आंधळे खून प्रकरण?
मरळवाडी गावचे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर जून २०२४ मध्ये गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्प केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. बबन गित्ते याच्यासह मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बबन गित्ते फरार झाला असून अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.