33.1 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुख हत्येचा वाल्मीक कराडच मुख्य सुत्रधार

संतोष देशमुख हत्येचा वाल्मीक कराडच मुख्य सुत्रधार

वाल्मीक कराडचा मेसेज आणि देशमुख यांची झाली हत्या दावे सीआयडी आणि पोलिसांनी खरे ठरविले

बीड : संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीकडून १५०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या करण्यात आली आहे. हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचे त्यात म्हणण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली असून संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा मेसेज वाल्मीक कराडने विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेला दिला होता, हे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जे आरोप आणि दावे वाल्मीक कराडबद्दल केले जात होते, ते पोलिसांनी तपासाअंती दाखल केल्या आरोपपत्रात सत्य ठरवण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली आणि वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून हे हत्याकांड घडल्याच्या दाव्यांना आरोपपत्रातून पुष्टी मिळाली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातील काही माहिती आता समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्या, खंडणी प्रकरण एकत्रित करून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, ७ तारखेला सुदर्शन घुलेने वाल्मीक कराडला कॉल केला होता. त्यावेळी वाल्मीक कराडने घुलेला सांगितले की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण कुणालाही सोडणार नाही. वाल्मीक कराडशी बोलणे झाल्यावर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या कार्यालयात कॉल केला आणि धमकी दिली. त्यानंतर ८ तारखेला सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि एक गोपनीय साक्षीदार यांची नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला वाल्मीक कराडचा निरोप सांगितला.

कायमचा धडा शिकवा; वाल्मीक कराडचा निरोप
गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, तिरंगा हॉटेलमध्ये जी बैठक झाली. त्यावेळी वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या माध्यमातून सुदर्शन घुलेला निरोप पाठवला होता की, संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या, तर त्याचे काय परिणाम होतात, हा संदेश इतरांना द्या.

कट रचला आणि अपहरण केले
८ तारखेला तिरंगा हॉटेलमध्येच संतोष देशमुख यांना मारण्याचा कट शिजला. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी संतोष देशमुख यांची उमरी टोलनाका येथे टाटा इंडिगो गाडी थांबवली आणि अडवून त्यांचे अपहरण केले. केज आणि मस्साजोगच्या मध्ये हा टोलनाका आहे. सुदर्शन घुलेच्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून चिंचोली टाकळीकडे घेऊन जात असताना अमानुष मारहाण करण्यात आली. ३.३० ते ६.३० वाजेपर्यंत मारहाण करण्यात आली.

पहिला आरोपी वाल्मीक कराड
सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना मारहाण करताना एक व्हीडीओ सुरू होता. जयराम चाटेने एका व्हॉट्स अप ग्रुपवर हा कॉल केला होता. तोच पुरावा सीडीआयने महत्त्वाचा मानला आहे. त्यातून या सगळ्यांनी एकत्रित येऊन हे कृत्य केले आहे असे आरोपपत्रात म्हटले आहे. याच आधारावर संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात पहिला आरोपी वाल्मीक कराड याला करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR