बुलडाणा : प्रतिनिधी
राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे, असा आरोप करत शेतक-यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी शेतक-यांसह मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. या इशा-यानंतर पोलिसांनी तुपकर यांना नोटीस बजावली आहे.
राज्यातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. शेतक-यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे.
त्यामुळे सरकारचे शेतक-यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतक-यांना घेऊन मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शेतकरी आत्महत्या कसा करतो याचे प्रात्यक्षिक दाखवणार, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. नागपूर येथे २० ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.