नायगांव : प्रतिनिधी
स्व. बळवंतराव पा. चव्हाण व स्व.वसंतराव पा.चव्हाण यांनी गोरगरीब जनतेसाठी शिक्षणाची गंगा नायगांवमध्ये आणून मोठे कार्य केले. शिक्षण क्षेत्रात पिता-पुत्राचे फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे खा. श्रीमंत शाहू महाराज यांनी स्व. बळवंतराव चव्हाण व स्व. वसंतराव पा. चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण व प्रथम पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात केले.
सामाजिक समतेचे प्रणेते स्व. मा. आ. बळवंतराव पा. चव्हाण व नांदेड जिल्ह्याचे लोकनेते स्व. वसंतराव पा. चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळा व प्रथम पुण्यतिथीनिमित नायगाव येथील जनता हायस्कूलच्या प्रागंणात स्व. बळवंतराव पा. चव्हाण यांच्या ज्ञानतीर्थ पुतळ्याचे तर ऍग्री कॉलेज येथे स्व. वसंतराव पा. चव्हाण यांच्या वसंतस्मृती व पुतळ्याचे श्रीमंत शाहू महाराज व मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. त्यांनतर मारुती मंदिर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात वसंतगाथा हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री कमलकिशोर कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत खा. शाहू महाराज, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार विश्वजीत कदम, खा. कल्याण काळे, खा. सुरेश शेटकर, खा. शिवाजीराव काळगे, खा. नागेश पा. अष्टीकर, खा. अजित गोपछडे, खा. शोभा बच्छाव, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आमदार सतेज पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी मंत्री भास्करराव पा. खतगावकर, माजी मंत्री माधवराव पा. किन्हाळकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. शामसुंदर शिंदे, माजी आ. अमर राजूरकर, माजी आ. मोहनराव हंबर्डे, माजी आ. माधवराव पा. जवळगावकर, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, माजी आ. गंगाधर पटणे, माजी आ. गंगाराम तेलंगणा, माजी आ. एच गंगाराम, तेलंगणा, शब्बीर अल्ली तेलंगणा, किशोर रेड्डी तामिळनाडू, कुणाल चौधरी, माधवराव पा. शेळगावकर, मारोतराव कवळे गुरुजी, शिवराज पाटील होटाळकर, राजेश कुंटूरकर, बरबडेकर, दिलीप पा. बेटमोगरेकर, बबन बारसे, भुजंग पाटील डक, बाळासाहेब रावणगावकर, बबनराव बारसे यांची उपस्थिती होती.
हा कौटुंबिक सोहळा : खा. अशोकराव चव्हाण
राजकारणात पक्ष बदलल्या जातात, विषय बदलतात, संदर्भ बदलतात, वैयक्तिक संबंधही बिघडतात. पण स्व. वसंतराव चव्हाण यांनी वैयक्तिक संबंधात कुठेही कटूता येऊ दिली नाही. मी आज भाजपमध्ये असलो तरी खा. रवींद्र चव्हाण यांनी वैयक्तिक संबंध जोपासताना कुठेही पक्षीय दृष्टीकोन येऊ दिला नाही. याबाबत अभिनंदन. या कार्यक्रमात जुने सहकारी भेटल्याने मला आनंद झाला. राजकीय मतभेद कुणाचेही असले तरी कौटुंबिक व वैयक्तिक संबंध जोपासले पाहिजेत. आम्ही वेगवेगळ््या पक्षांचे असलो तरी हा कार्यक्रम कौटुंबिक आहे, असे खा. अशोकराव चव्हाण म्हणाले.
सामान्यांचा असामान्य नेता स्व. वसंतराव चव्हाण
-: माजी मंत्री अमित विलासराव देशमुख
स्व. बळवंतराव चव्हाण व स्व. वसंतराव चव्हाण हे सामान्य लोकांसाठी झगडले. ते सामान्य माणसांचे सामान्य नेतृत्व होते. स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद खा. रवींद्र चव्हाण यांना द्यावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना करून नायगावच्या विकासासाठी चव्हाण कुटुंबीय कदापिही कमी पडणार नाहीत. चव्हाण घराण्याचा वारसा सतत पुढे नेण्यासाठी त्यांना जनतेने साथ द्यावी, असे आवाहन माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनी याप्रसंगी केले. जर कोणाला स्वगृही परतायचेच असेल तर है तयार हम म्हणत अमित देशमुख यांनी काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले.