सोलापूर : सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची मागणी महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्याकडे वीरशैव व्हिजनने केली. 8 मे 1930 च्या सकाळी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता समाजातच युवक संघाने जंगी मिरवणूक काढली. मिरवणूक बाळीवेशीत असतानाच काही तरुण रूपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडे तोडण्याच्या सत्याग्रहासाठी गेले.
ही बातमी कळताच इन्स्पेक्टर नेपेट दोन पोलीसांच्या गाड्या घेऊन तेथे हजर झाला. दरम्यान, कलेक्टर हेनरी नाईट आणि डी .एस. पी. प्लेफेअर हे मोठा ताफा घेऊन आले. मोठा जमाव होता. अडथळे टाकून रस्ते बंद केले होते. रूपाभवानी मंदिराजवळ दंगल सुरू असल्याची बातमी समजतात मल्लप्पा धनशेट्टी तेथे आले. अवघ्या १८ वर्षाचे शंकर शिवदारे तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टरच्या दिशेने धावले. कलेक्टरच्या जीवाला धोका आहे, असे समजून इंग्रज पोलीस सार्झेट हॉल याने शंकर शिवदारे यांच्या छातीवर गोळी झाडली. त्यात ते हुतात्मा झाले. सोलापूरचे पहिले हुतात्मा शंकर शिवदारे आहेत.
शिवदारे सोलापूरचे पहिले हुतात्मे असून देखील त्यांचा पुतळा शहरात नाही. त्यांच्या संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाही. त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिले त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे त्यांचा पुतळा उभारावा. त्यांच्या हौतात्म्यांची माहिती देणारा फलक लावण्यात यावा. त्या प्रसंगाचा भित्तीचित्र त्याठिकाणी असावे अशी मागणी यावेळी वीरशैव व्हिजनच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. यामुळे सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्या बद्दलची माहिती सोलापूरकरांना होईल.
यामुळे सोलापूरचा धगधगता स्वातंत्र्यसंग्राम लोकांसमोर उभा राहील. यावेळी राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सचिव नागेश बडदाळ, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, योगेश कापसे, शिवानंद येरटे, महेश बुरकुले, शंकर बंडगर, आकाश आंडगे उपस्थित होते.