मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असे आदिती तटकरे यांनी म्हटले. काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत, असे देखील आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या. आधार कार्ड मिस मॅचच्या तक्रारी आल्या होत्या. ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असे आदिती तटकरे यांनी म्हटले. लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करत आहोत, असे देखील त्या म्हणाल्या.
शासन निर्णयात बदल होणार नाही : आदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, असे आदिती तटकरे यांनी म्हटले. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत. काही महिलांकडून ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज आले होते. काही महिलांचे लग्नानंतर स्थलांतर देखील झाले असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या. चारचाकी वाहने ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल, असे देखील आदिती तटकरे म्हणाल्या. आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत, असे आदिती तटकरे यांनी म्हटले.
२१०० रुपये कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत महिलांच्या खात्यात प्रत्येकी ९ हजार रुपये जमा झाले आहेत. डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम १५०० रुपयांनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.