30.7 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार काळाच्या पडद्याआड, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार काळाच्या पडद्याआड, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

मुंबई : ‘भारत कुमार’ या टोपणनावासाठी आणि देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झालं आहे. प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मधे दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मुख्य भूमिका असलेला त्यांचा पहिला चित्रपट राजा खोसला यांचा १९६४ मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ सुपरहिट ठरला. या चित्रपटातील ‘लग जा गले’ आणि ‘नैना बरसे रिमझिम’ ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट देणारे बॉलिवूडचे सुपरस्टार मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांमधून लोकांना पडद्यावर देशभक्तीची खोल भावना अनुभवायला लावली. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे. असं म्हटलं जातं की, भगतसिंग यांच्यावर या अभिनेत्याचा खूप प्रभाव आहे आणि त्यांनी ‘शहीद’ सारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलं आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले.

मनोज कुमार यांचा अल्पपरिचय
मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी एबटाबाद (पाकिस्तान) या ठिकाणी झाला. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. चित्रपटसृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केला होता. पण त्यांना खरी ओळख ‘भारत कुमार’ या नावाने मिळाली. हरिकिशन गिरी गोस्वामी यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले. यामुळे त्यांनी आपले हरिकिशन हे नाव बदलत मनोज कुमार असे केले.

मनोज कुमार यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ते मुंबईत आले. १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९६० मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या अनेक चित्रपटात ते झळकले. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव ‘भारत’ असे असायचे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले.

मनोज कुमार यांचे गाजलेले चित्रपट
मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब औऱ पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले. शहीद सिनेमातील त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचं तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केलं होतं. १९६२ मध्ये विजय भट्ट यांच्या ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटानं त्यांना सर्वात मोठं यश मिळालं, जो व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरला. या चित्रपटात माला सिन्हा होत्या. ‘हरियाली और रास्ता’, ‘शादी’ चित्रपटाच्या च्या यशानंतर ‘डॉ. विद्या आणि गृहस्थी या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR