27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना राज कपूर तर शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवन...

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना राज कपूर तर शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे तसेच स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन. चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली. येत्या २१ ऑगस्ट रोजी एका विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे असून स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप सहा लाख रुपये , मानपत्र आणि मानचिन्ह असे आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे आहे.तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ६ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे आहे.

राज्याचेच नव्हे तर देशाचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करणा-या या कलाकारांचा सर्वांना अभिमान आहे. त्यांना पुरस्कार जाहीर करताना मनापासून आनंद होत आहे. हे सर्व जण सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव अधिकाधिक उंचावत राहतील, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्राप्त कलावंतांचे अभिनंदन केले. दरम्यान, पुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येत्या २१ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता एनएससीआय डोम, वरळी मुंबई येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR