मुंबई : ज्येष्ठ चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (दि.२४) सकाळी मुंबईत निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत जानी दुश्मन, नागिन यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ते १९६३ पासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. संध्याकाळनंतर त्यांच्यावर अन्त्यसंस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माहितीनुसार, राजकुमार कोहली आज (दि.२४) सकाळी आंघोळीसाठी गेले होते. बराचवेळ होऊनही ते बाहेर आले नाहीत. तेव्हा त्यांचा मुलगा अभिनेता अरमान कोहली यांनी बाथरूमचा दरवाजा उघडून पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे निधन झाले आहे.
राजकुमार कोहली यांचा जन्म १९३० मध्ये झाला. १९६३ मध्ये रिलीज झालेल्या ‘सपना’ आणि १९६६ मध्ये पंजाबी चित्रपट ‘दुल्ला भाटी’ दिग्दर्शित करून त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नागिन, जानी दुश्मन यासारखे चित्रपट केले. भारतातील पहिल्या हॉरर हिट चित्रपटांपैकी जानी दुश्मन या चित्रपटाचा उल्लेख केला जातो.
एक अनोखी कहानी, नौकर बीवी का, इंतकाम यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांचे हे चित्रपट खूप गाजले. ९० च्या दशकात ते चित्रपटसृष्टीपासून दूर गेले आणि शतक संपल्यानंतर फक्त एकच चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. तो म्हणजे जानी दुश्मन : एक अनोखी कहानी. कोहली यांचा विवाह पंजाबी चित्रपट स्टार निशी यांच्याशी झाला. निशी यांच्यासोबत त्यांनी १९६३ मध्ये पंजाबी चित्रपट ‘पिंड दी कुडी’मध्ये काम केले होते. राजकुमार आणि निशी यांना गोगी आणि अरमान अशी दोन मुले आहेत. त्यांचा लहान मुलगा अरमान हा देखील अभिनेता आहे.