धाराशिव : प्रतिनिधी
शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बॅँकेचे तत्कालिन चेअरमन तथा बँक आर्थिक घोटाळ््यातील मुख्य आरोपी विजय दंडनाईक हे सोमवारी दि. २२ जानेवारी रोजी सकाळी पोलीसांना शरण आले. ते स्वत: होऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. २८ जुलै २०२३ रोजी या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात वसंतदादा बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक, संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या विरोधात ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपी फरार झाले होते.
पोलिसांनी सर्वत्र शोध घेण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, पण ते पोलीसांना सापडत नव्हते. आरोपींनी अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून मोठे प्रयत्न केले. धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. सर्वोच्च न्यायालयात ही दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने अखेर सहा महिन्यांनी बँक घोटाळ््यातील मुख्य आरोपी विजय दंडनाईक सोमवारी सकाळी पोलीसांना शरण आले. वसंतदादा बँकेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालिन चेअरमन तथा मुख्य आरोपी विजय दंडनाईक, व्यवस्थापक दीपक भिवाजी देवकते, संचालक पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बाबूराव आकोसकर, गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, सीए भीमराव ताम्हाणे, विष्णूदास रामजीवन सारडा, महादेव गव्हाणे, लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे संशयित आरोपी फरार झाले होते. त्यांनी अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.
ठेवीची मुदत संपूनही ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने ठेवीदार संस्था असलेल्या प्रभात सहकारी पतपेढीचे व्यवस्थापक विनोद वडगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली २८ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.