22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeधाराशिवविजय दंडनाईक यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर

विजय दंडनाईक यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या ते जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्या अर्जावर एक फेब्रुवारी रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. जी. मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. २ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निकाल दिला असून विजय दंडनाईक यांचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे. वसंतदादा नागरी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक यांना पोलिसांनी दि. २२ जानेवारी रोजी दुपारी अटक केली होती.

ते दि. २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीसांनी विजय दंडनाईक यांना हजर केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वसंतदादा बँकेच्या पदाधिकारी, संचालक व कर्मचा-यांनी ठेवीवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात २८ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार होते. त्यापैकी मुख्य आरोपी असलेले विजय दंडनाईक हे पोलीसांना शरण आले. त्यानंतर पोलीसांनी त्यांना अटक केली होती.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी २८ जुलै २०२३ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात वसंतदादा बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दीपक देवकते, संचालक मंडळ यांच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी सर्वत्र शोध घेण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, पण ते पोलीसांना सापडत नव्हते. आरोपींनी अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून मोठे प्रयत्न केले. धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही काही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. सर्वोच्च न्यायालयात ही दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने अखेर सहा महिन्यांनी बँक घोटाळ््यातील मुख्य आरोपी विजय दंडनाईक पोलीसांना शरण आले.

वसंतदादा बँकेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दीपक भिवाजी देवकते, संचालक पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बाबूराव आकोसकर, गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, सीए भीमराव ताम्हाणे, विष्णूदास रामजीवन सारडा, महादेव गव्हाणे, लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे संशयित आरोपी फरार झाले होते. ठेवीची मुदत संपूनही ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने ठेवीदार संस्था असलेल्या प्रभात सहकारी पतपेढीचे व्यवस्थापक विनोद वडगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरेशे तारण न घेता जवळच्या नातेवाईकांना व कर्मचा-यांना लाखो रूपयांचे कर्ज वाटप केले. वाटप केलेल्या कर्जाची वसुलीही केली नाही. बोगस कजर्वाटपाचा संशय आल्याने रिझर्व बँकेने वसंतदादा नागरी बँकेचा बँकींग परवाना रद्द केला. पाच लाखापेक्षा जास्तीची ठेव असलेल्या १३८ लोकांच्या जवळपास २० ते २२ कोटी रूपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. यामध्ये धाराशिव शहरातील अनेक पतसंस्थेचे कोट्ययवधी रूपये अडकले आहेत.

न्यायालयीन कोठडीत असताना विजय दंडनाईक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पाटील यांनी नियमित जामीन मिळावा, म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने फिर्यादी पक्षाचे व आरोपी पक्षाचे म्हणणे ऐकूण व ठेवीदारांनी ही जामीन देण्यास न्यायालयात विरोध दर्शविल्याने विजय दंडनाईक यांना जामीन नाकारला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR