भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या अनेक झंझावाती व स्फोटक खेळींनंतर क्रिकेट विश्वात त्यांच्याबद्दल ‘रोक सको तो रो-को’ अशी आव्हानात्मक घोषणा प्रचलित झाली आहे. अर्थात खेळाडूंचे वय जसे वाढत जाते तसे त्यांचा अनुभव वाढतो पण शारीरिक क्षमता कमी होण्यास सुरुवात होते.
कोहली व रोहित हेही याला अपवाद नाहीत व त्यांनी स्वत:ला तसे मानलेही नाही. त्यामुळे दोघांनीही अगदी वेळेत आणि लयीत असतानाही क्रिकेटच्या कसोटी व टी-२० प्रकारापासून स्वत:ला दूर करण्याचा निर्णय घेत युवा खेळाडूंना वाट करून दिली. मात्र, आपल्या देशात दोन क्षेत्रातले ‘गॉसिपिंग’ अत्यंत प्रिय आहे आणि त्यात चित्रपट क्षेत्र व क्रिकेटचा नंबर लागतो. त्यामुळे साहजिकच ‘रो-को’च्या संदर्भानेही गॉसिप्सचा महापूर सुरू असतो.
प्रत्येक दौ-यासाठीच्या संघ निवडीपासून त्या दौ-यातील प्रत्येक सामन्यात या दोघांच्या खेळीबाबत उलटसुलट बातम्या, मते, तर्क व्यक्त होत असतातच! त्यातूनच २०२७ च्या वन-डे विश्वचषकात ही दिग्गज जोडी भारताकडून खेळताना दिसणार की नाही? यावर सध्या दर सामान्यागणिक जोरदार चर्चा झडतायत! त्यात बीसीसीआय ‘रो-को’ला त्यांचे वाढते वय लक्षात घेऊन देशांतर्गत सामने खेळण्याचा सल्ला देऊन अशा चर्चांना आणखी हवा देतेय! मात्र, या सगळ्या चर्चा झडताना किंवा करताना ही बाब दुर्लक्षित होता कामा नये की आज रोहित शर्मा व विराट कोहली क्रिकेट क्षेत्रात ज्या स्थानावर आहेत तिथे पोहोचण्यासाठी खेळाडूत प्रचंड गुणवत्तेबरोबरच कठोर मेहनत, सातत्य, आपल्या खेळावरचे प्रेम आणि त्या खेळात उत्तम योगदान देण्याची न संपणारी भूक या गोष्टींचा व गुणांचा समन्वय हवा.
यातील एकाही गोष्टीचा अभाव त्या खेळाडूस लगेच परतीच्या वाटेला लावू शकतो. ‘रो-को’मध्ये या सगळ्या गुणांचा योग्य समन्वय आहे आणि म्हणूनच ते ‘लिजेंड’ बनलेत व प्रत्येक खेळीबरोबर नवनवे विश्वविक्रम नोंदवून विक्रमवीर ठरतायत. मोठ्या विश्रांतीनंतर एकदिवसीय कारकीर्दीच्या नव्या आव्हानावर विराट व रोहित मोठ्या आत्मविश्वासाने आरूढ झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत निराशाजनक कामगिरी केल्यावर अखेरच्या सामन्यात कोहलीने अर्धशतकी तर रोहितने शतकी खेळी केली होती.
तीच लय कायम ठेवताना या जोडीने रविवारी द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चाहत्यांना पुन्हा एकवार तुफानी ‘रो-को’शोचे दर्शन घडविले. ‘रो-को’च्या भविष्याबाबत तर्क-वितर्क व्यक्त करणा-यांना आपल्या बॅटने उत्तर देताना कोहलीने विश्वविक्रमी ५२ वे एकदिवसीय सामन्यातील शतक झळकावले तर रोहितने अर्धशतकी खेळी करताना जागतिक सिक्सर किंग होण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. विराटने ५२ वे वन-डे शतक ठोकताना क्रिकेटच्या एका प्रकारातील सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमधील ५१ शतकांचा विश्वविक्रम मागे टाकत नवा विक्रम नोंदविला.
अवघ्या १२० चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांसह विराटने १३५ धावांची दमदार खेळी केली आणि कसोटी सामन्यातील निराशाजनक पराभवाने मरगळून पडलेल्या भारतीय फलंदाजीत जोरदार आत्मविश्वास भरला. हीच दिग्गज खेळाडूंची खासियत असते. ते स्वत:च्या खेळीने संघाला केवळ सुस्थितीत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडत नाहीत तर संघातील प्रत्येक खेळाडूला उत्तम खेळाची प्रेरणा व आत्मविश्वास देतात. ‘रो-को’ शोने हेच घडवले आणि कसोटी सामन्यात सपशेल शरणागती पत्करलेल्या भारतीय संघाने थेट विजयाचा रस्ता धरून द. आफ्रिका संघाला जमिनीवर आणले. वन-डेतील सर्वाधिक शतके ठोकणा-या फलंदाजांत कोहली अगोदरच ५१ शतकांसह अव्वल स्थानावर होता.
त्यात आता विश्वविक्रमी ५२व्या शतकाची भर त्याने टाकली आहे. ४९ शतकांसह सचिन तेंडुलकर दुस-या क्रमांकावर तर ३३ शतकांसह रोहित शर्मा तिस-या क्रमांकावर आहे. ३० शतकांसह ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग चौथ्या तर २८ शतकांसह श्रीलंकेचा सनथ जयसूर्या पाचव्या क्रमांकावर आहे. वन-डे मध्ये कोहलीने मायदेशात २५ शतके ठोकली असून हा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. ५२ वे विश्वविक्रमी शतक झळकावताना विराटने आपले द. आफ्रिकेविरुद्धचे ६ वे शतक झळकावले आहे.
या क्रमवारीतही त्याने ५ शतके झळकावणा-या सचिन तेंडुलकरला मागे टाकले. आता कोहलीची वन-डे कामगिरी ३०६ वन-डे मध्ये ५८.०२ च्या सरासरीने ५२ शतके व ७५ अर्धशतकांसह १४३९० धावा अशी डोळे दिपवून टाकणारी आणि खेळाडू म्हणून त्याचा ‘क्लास’ सिद्ध करणारी झाली आहे. तर याच सामन्यात रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा शाहिद आफ्रिदीचा ३५१ षटकारांचा विश्वविक्रम मोडित काढून ३५२ षटकारांचा नवा विश्वविक्रम नोंदविला आहे.
शाहिद आफ्रिदीला ३५१ षटकारांचा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी ३९८ सामने लागले होते. रोहितने केवळ २७० व्या डावात हा विश्वविक्रम मोडून नवा विश्वविक्रम स्थापन केला. या यादीत ३३१ षटकार ठोकणारा ख्रिस गेल तिस-या तर २७० षटकार ठोकणारा सनथ जयसूर्या चौथ्या स्थानावर आहे. २२९ षटकारांसह महेंद्रसिंह धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. रोहितचा टी-२० मधील सर्वाधिक २०५ षटकारांचा विक्रम त्याच्याच नावे अबाधित आहे. रोहितने एका देशातील सर्वाधिक षटकारांचा विक्रम म्हणजे भारतातील १८२ षटकारांचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
एकंदर काय तर ‘रो-को’च्या प्रत्येक खेळीनंतर आता नवे विक्रम स्थापन होत राहणे अटळ आहे. थोडक्यात विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा समृद्ध वारसा हे दोघे समर्थपणे पुढे चालवत आहेत आणि म्हणूनच त्यांना नवे विक्रमवीर असे अभिमानाने संबोधणे हेच योग्य राहील, हे मात्र निश्चित!

