पालम : तालुक्यात मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या केरवाडी ते सिरपूर रस्त्याच्या मागणीसाठी ६ गावातील ग्रामस्थांनी गुरूवार, दि.३ पासून उपोषणास सुरुवात केली. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यानंतर एकदा डांबर या रस्त्याच्या वाट्याला आले होते. त्यानंतर रस्त्याच्या मंजुरीसाठी उपोषण केले. त्यावर उपोषणस्थळी येऊन आ. रत्नाकर गुट्टे यांनी रस्ता मंजूर केला. तदनंतर थोडेफार काम झाल्यानंतर कंत्राटदाराने काम बंद केले. त्याला अडीच वर्ष लोटले तरीही पुन्हा कामास सुरुवात केली नाही.
परिणामी, पावसापूर्वीच कृषी निविष्ठा गावात नेवून ठेवणे, मान्सूनमध्ये विद्यार्थ्यांची शाळा बुडणे, रूग्नांची हेळसांड हे संकट प्रशासनामुळे पाच गावांवर ओढवले. त्यात पालम ते सिरपूर शिवरस्त्यादरम्यानच्या खदानित पालम नगरपंचायकडून टाकण्यात येणारा कचरा बंद करण्यात यावा, सिरपूर ते पालम राज्यरस्त्याचे काम मंजूर करावे, सिरपूर येथे ऐकमेव ट्रान्सफार्मर असून त्यावर लोड सहन होत नसल्याने दुसरे ट्रान्सफार्मर मंजूर करून विजेचे खांब देण्यात यावेत आदी मागण्यांचा समावेश आहे.
जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होणार नाही, तोपर्यंत सिरपूरसह सायळा, केरवाडी, उमरथडी, धनेवाडी, खुलेर्वाडी, रावराजूरवासिय उपोषण सुरूच ठेवणार आहेत.
अभियंत्यांचे वेळकाढू धोरण
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांनी मागील अडीच वर्षापासून निधी नाही किंवा लवकरच काम सुरू करू असे कारण समोर करून वेळ मारून नेली. परिणामी, रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. आता पावसाळा तोंडावर असताना देखील हालचाली या विभागाच्या नाहीत.
कंत्राटदाराची वल्गना फोल ठरली
या स्त्याच्या उद्घाटन प्रसंगी कंत्राटदाराने दोन महिन्यात काम पूर्ण करून देणार, अशी वल्गना केली होती. त्यानंतर कंत्राटदार फिरकला देखील नाही. फोन स्वीकारत नाहीत, फोन घेतला तरी आज उद्या करून अडीच वर्ष घातली पण रस्ता सुरू करण्याचा पत्ता नसल्याने नागरीकांत तीव्र नाराजी आहे.