मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक काळात विनोद तावडेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपयांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नालासोपारामध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. बहुजन विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडले.
दरम्यान, राज्यात विधानसभेची निवडणूक होते आहे. उद्या मतदान होणार आहे. असे असतानाच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये घेरले आहे. यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटांत तुफान राडा सुरू आहे. जोवर विनोद तावडे हॉटेलच्या खाली येऊन लोकांशी बोलणार नाहीत, तोवर इथून हटणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
विनोद तावडे आणि त्यांचे कार्यकर्ते विरार पूर्व मनवेलपाडामधील विवांता हॉटेलमध्ये बसले होते. तेव्हा क्षितिज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. काळ्या रंगाच्या बॅगमधून डायरी बाहेर काढत क्षितिज ठाकूर यांनी जाब विचारला.
हितेंद्र ठाकूर यांचे आरोप काय?
विनोद तावडे यांनी मतदारांना वाटण्यासाठी १५ कोटी आणल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. जोवर कारवाई होत नाही, तोवर तावडेंना सोडणार नाही. माफ करा मला जाऊ द्या, अशी विनंती करणारे फोन विनोद तावडे करत आहेत. २५ फोन विनोद तावडे यांनी केले आहेत, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. माझा फोन बघा. त्यांचे किती इनकमिंग कॉल आहेत. मला अगोदरच कळाले होते विनोद तावडे पाच कोटी घेऊन पैसे वाटण्यासाठी येणार आहेत. डाय-या मिळाल्या आहेत. विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार निवडणूक अधिका-यांनी कारवाई करावी.