15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeराष्ट्रीयनिवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन; १९ नोव्हेंबरला सुनावणी

निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन; १९ नोव्हेंबरला सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

नवी दिल्ली : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे या निवडणुका पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा दावा करणा-या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत सहमती दर्शवली आहे.

याचिकेवर १४ नोव्हेंबर शुक्रवारी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य सचिव तसेच महसूल व नगरविकास विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गांच्या आरक्षणाला ५० टक्क्यांची मर्यादा आखून देत सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये ऐतिहासिक निकाल दिला. . त्या आरक्षण मर्यादेचे महाराष्ट्रात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लंघन झाले आहे, असा दावा करीत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली.

त्यांच्या याचिकेची शुक्रवारी न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गंभीर दखल घेतली. तसेच याचिकेवर सुनावणी घेण्याचे निश्चित करीत खंडपीठाने याचिकेत प्रतिवादी असलेल्या राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह महसूल आणि नगरविकास विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली होती. दरम्यान, आता या याचिकेवर १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

राज्यात निवडणुकांची तयारी पूर्ण
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अर्धी प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. पुढील महिन्यात नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आरक्षण मर्यादेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR