मुंबई : प्रतिनिधी
नागपूरात सोमवारी रात्री जो प्रकार घडला तो हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आला. निश्चितपणे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. हल्ल्यात तीन उपायुक्तांसह ३३ पोलिस जखमी झाले. एका उपायुक्तावर तर कु-हाडीने हल्ला झाला. हल्ल्यात एकूण ५ नागरिक जखमी झाले आहेत. पोलिसांवरील हल्ला अजिबात सहन केला जाणार नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना अजिबात सोडण्यात येणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
महाराष्ट्र प्रगतीशील राज्य आहे. आपल्याकडे मोठया प्रमाणात गुंतवणूक येते आहे. इथे शांतता राहिली तर प्रगतीकडे जाउ. यापुढे कोणीही दंगा केल्याचा प्रयत्न केला तर जात धर्म न पाहता कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. नागपूर येथील हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली. हल्ला पूर्वनियोजित असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेब कबर हटाओ म्हणत आंदोलन केले.
गवताची प्रतिकात्मक कबरही जाळली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. संध्याकाळी अफवा पसरविली गेली की जी प्रतिकात्मक कबर जाळली. त्यावर धार्मिक मजकूर होता. नमाज आटोपल्यानंतर जमाव जमला व घोषणा दिल्या. हंसापुरी भागात दोनशे ते तीनशेंचा जमाव दगडफेक करू लागले. त्यात बारा दुचाकींचे नुकसान. संध्याकाळी साडेसात वाजता दुसरी घटना घडली. एक क्रेन, जेसीबी जाळले.
संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला कारण तिथे एक ट्रॉलीभरून दगड मिळाले. काही लोकांनी दगड जमा करून ठेवले होते. शस्त्रे देखील मोठया प्रमाणात जप्त करण्यात आली. ठरवून काही घरे व दुकानांना लक्ष्य करण्यात आले. निश्चितपणे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत
या वेळच्या हल्ल्यात तीन उपायुक्तांसह ३३ पोलिस जखमी झाले आहेत. एका उपायुक्तावर तर कु-हाडीने हल्ला झाला. एकूण पाच नागरिक जखमी असून त्यापैकी एक आयसीयूत आहे. एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून ११ पोलिस ठाण्याच्या हददीत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या पाच तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस महासंचालकांनी राज्यभर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांवरील हल्ले अजिबात सहन करण्यात येणार नाहीत. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झाले तरी सोडण्यात येणार नाही असेही फडणवीस म्हणाले.
शांततेचे आवाहन
छावा या चित्रपटाने खरा इतिहास समोर आणला पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावना प्रज्ज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबददलचा राग बाहेर येतो आहे असे असले तरी सर्वांनी संयम राखला पाहिजे. महाराष्ट्र राज्य प्रगतीशील आहे, मोठया प्रमाणात गुंतवणूक येते आहे. इथे शांतता राहिली तरच प्रगतीकडे जाउ. यापुढे कोणीही दंगा केल्याचा प्रयत्न केला तर जात धर्म न पाहता कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी जालना शहरात देखील छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करण्यात आल्याचा मुददा उपस्थित केला. त्यावर पोलिस कठोर कारवाई करतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
औरंगजेबाचे उदात्तीकरण हा देशद्रोह : शिंदे
गेल्या काही दिवसांपासून या राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण का सुरू आहे, कोणी सुरू केले याच्या मुळाशी सरकार जाईल असे स्पष्ट करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, औरंग्याचे उदात्तीकरण करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणे असून हा देशद्रोहच आहे. औरंग्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता. असा इतिहास असताना औरंग्याचे उदात्तीकरण का. सच्चा देशभक्त मुसलमान देखील औरंग्याचे समर्थन करणार नाही. औरंगजेब कोण संत होता का. तो महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.
नागपूरमध्ये आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही समाजाला शांत केले होते. मात्र काही तासांत लगेचच दोन-पाच हजारांचा मॉब कसा जमला. घरात मोठे दगड टाकले. हॉस्पीटलची तोडफोड केली. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केले गेले. दंगखोरांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले. वाहनेही जाळण्यात आली. एका विशिष्ट ठिकाणी शंभर दीडशे बाईक पार्क व्हायच्या पण काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती. याचा अर्थ हे नियोजनपूर्वक षडयंत्र होते विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचे. पोलिसांवरही हल्ला केला असे असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करतात. कोणाची तुलना कोणाबरोबर करताय. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.