जालना- जालन्यात धनगर समाजाच्या आंलोदलनाला हिंसक वळण लागले आहे. जमलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडल्या आहेत. याठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने आंदोलक जमले होते. यावेळी ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
धनगर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसले आणि त्यांनी तोडफोडीला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालय, बाहेर ठेवलेल्या कुंड्या, खुर्च्या यांची नासधूस करण्यात आली. कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. यावेळी पोलिसांची संख्या कमी असल्याने त्यांना शेकडोंच्या संख्येने असलेल्या आंदोलकांना रोखता आले नाही.
काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन जालन्यात मोठी नासधूस घडून आली होती. आता पुन्हा जालना जिल्ह्यातच आंदोलक हिंसक झाल्याने पोलिस यंत्रणेवर प्रश्व उपस्थित होत आहेत. पोलिसांना आंदोलक आक्रमक होतील असे वाटले नव्हते का? तसेच आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असताना कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.