बीड : आमदार धनंजय मुंडे यांचा आका म्हणून आमदार सुरेश धसांनी वाल्मीक कराडचा परिचय दिला. त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप झाला. परंतु आता याच सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे समोर आले आहे. खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी, सोबत डझनभर नातेवाइक असा लवाजमा असलेला एक कथित व्हीडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरला झाला.
शिरुर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील सतीश उर्फ खोक्या भोसले याने बुलडाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करुन बॅटने मारहाण केली होती. तसेच बावी येथील ढाकणे बापलेकाला मारहाण करुन दात पाडले होते. याप्रकरणी खोक्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. सोबतच वनविभागाच्या धाडीतही त्याच्या घरात वाळलेले मांस सापडल्याने वेगळा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांमध्ये तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
पोलिसांची बघ्यांची भूमिका
खोक्या हा कारागृह परिसरात खाली बसून जेवत आहे. त्याच्या बाजूला १० ते १५ नातेवाइक, कार्यकर्ते उभे दिसत आहेत. हे सर्व असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलिस वादात सापडले आहेत.
बोलण्यासाठी मोबाइलही दिला
न्यायालयीन कोठडीत असलेला खोक्या हा जेवणानंतर फोनवर बोलत नातेवाइकांकडे जातो. सोबत एक पोलिस कर्मचारीही असल्याचे व्हीडीओमध्ये दिसते.
आरोपींना या सुविधा कशासाठी?
वाल्मीक कराडला सुविधा दिल्याचा आरोप झाल्यानंतर आता खोक्यालाही व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे व्हीडीओ व्हायरल होत आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना एवढ्या सुविधा कशासाठी? पोलिसांची भूमिका मोजक्या आरोपींसाठी मवाळ का झाली ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दादा खिंडकरचेही पोट बिघडले
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर याच्यावरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो न्यायालयीन कोठडीत होता. परंतू सोमवारी सायंकाळी त्याचेही पोट बिघडले आणि तो जिल्हा रूग्णालयात दाखल झाला.