नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. २००८ मध्ये याच दिवशी विराट कोहलीने डंबुला येथे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. काही महिन्यांनंतर, तो क्वालालंपूरमध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकणारा कर्णधारही बनला. जय शहा यांनी आपल्या संदेशातम्हटले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण केल्याबद्दल किंगचे अभिनंदन!
आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कोहलीने सध्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत सलामीला फलंदाजी केली आणि फक्त १२ धावात तंबुत परतला होता. त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मालिकेत त्याने पाच सामन्यांमध्ये ३१.८० च्या सरासरीने १५९ धावा केल्या होत्या. आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ही विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करून सुभेच्छा दिल्या आहेत.आरसीबीने आपल्या अभिनंद पोस्टमध्ये लिहिले की, किंगची १६ वर्षे आणि त्याचे जादूई साम्राज्य. किंग कोहलीचा जयजयकार. पदार्पणापासून ते प्रमाणित आख्यायिका दर्जा प्राप्त करण्यापर्यंत. १६ वर्षांच्या उत्कटतेने विराटने केवळ खेळच खेळला नाही तर त्याने क्रिकेटचा एक नवीन परिपूर्ण ब्रँड डिझाइन केला आहे!
कोहली भारतासाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह फलंदाज आहे. त्याने २९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३,९०६ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. विराटने ११३ कसोटी सामन्यांमध्ये ८,८४८ धावा आणि १२५ टी-२० सामन्यांमध्ये ४,१८८ धावा केल्या आहेत. कोहलीने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता, त्यानंतर त्याने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.