कोलकाता : आयपीएल २०२५ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने साजेशी कामगिरी केली असे म्हणायला हरकत नाही. आरसीबीचा कर्णधार रजत पाटिदार याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी करताना आरसीबीने कोलकात्याचे ८ गडी बाद करत १७४ धावांवर रोखले. खरं तर हे आव्हान सोपे असल्याने सहज गाठेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे.
दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी रनमशिन्स विराट कोहली आणि फिल सॉल्ट ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने आक्रमक सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये कोलकात्याच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्ती यालाही सोडले नाही. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा विराट कोहलीने एक विक्रम आपल्या नावावर केला.
विराट कोहलीचा टी २० क्रिकेट कारकिर्दितील हा ४०० वा सामना आहे. अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. टी २० फॉर्मेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा मान रोहित शर्माकडे आहे. त्याने ४४८ सामने खेळले आहेत. त्यानंतर दिनेश कार्तिकचा नंबर लागतो. त्याने ४१२ सामने खेळले आहेत.
दुसरीकडे, विजयासाठी दिलेल्या १७५ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने सावध खेळी केली. यासह विराट कोहलीने दुसरा विक्रम नोंदवला. विराट कोहलीने २८ धावा करताच सर्वाधिक धावा करणा-या खेळाडूंच्या यादीत टॉप ५ मध्ये सहभागी झाला आहे. कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणा-या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने ८ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
विराट कोहली टी २० क्रिकेटमध्ये १३ हजार धावा करण्याच्या वेशीवर आहे. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज होणार आहे. कोहलीनंतर रोहित शर्मा ११८३० धावांसह दुस-या क्रमांकावर आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्रिस गेल (१४५६२), ऍलेक्स हेल्स (१३६१०), शोएब मलिक (१३५३७) आणि किरॉन पोलार्ड (१३५३७) यांनी १३ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम आधीच केला आहे.