दुबई : विराट कोहलीने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आज आपल्या नावावर केला असून विराटने आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकदिवसीय सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा करणारा कोहली जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
कोहलीने २९९ व्या एकदिवसीय सामन्याच्या २८७ व्या डावात ही चमकदार कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात कोहलीने बांगलादेशविरुद्ध फक्त २२ धावा केल्या होत्या. त्यामुळे या ऐतिहासिक विक्रमापासून तो अवघ्या १५ धावा दूर होता. मात्र आज दुबईत पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हा विक्रम केला आहे. कोहलीने १३ व्या षटकातील दुस-या चेंडूवर चौकार मारून हा विक्रम केला आहे.
यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने आपल्या ३५० व्या डावात हा विक्रम केला होता. सचिननंतर श्रीलंकेचा कुमार संगकाराने ३७८ डावात १४ हजार वनडे धावा केल्या होत्या. आता कोहलीने सर्वात जलद १४ हजार धावांचा विक्रम केला आहे.
रोहित शर्मानेही मोडला सचिनचा विक्रम
भारताचा फलंदाज रोहित शर्मानेही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खाते उघडताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ९००० धावा पूर्ण केल्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ १८१ डावात ९००० धावांचा टप्पा ओलांडला. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ९००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी १९७ डाव खेळले होते. आता रोहित शर्माने हा विक्रम मोडून आपल्या नावावर केला आहे. सचिनशिवाय रोहित शर्माने सौरव गांगुली, ख्रिस गेल, अॅडम गिलख्रिस्ट आणि सनथ जयसूर्यासारख्या दिग्गज सलामीवीरांनाही मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ९००० धावा पूर्ण करण्यासाठी सौरव गांगुलीने २३१ डाव, ख्रिस गेलने २४६ डाव, अॅडम गिलख्रिस्टने २५३ डाव आणि सनथ जयसूर्याने २६८ डाव घेतले होते. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. त्याने १५ चेंडूंत १३३.३३ च्या स्ट्राइक रेटने २० धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला.