पुणे : पुणे हिट आणि रन प्रकरणात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोघांना चिरडले होते. त्या प्रकरणानंतर पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नाही. त्यानंतर माध्यमांमधून प्रचंड टीका सुरु झाली. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबातील लोकांना आणि इतर जणांना अटक केली. त्या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यासंदर्भात तक्रारी देण्याचे आवाहन केले होते.
त्यानंतर विशाल अग्रवालसंदर्भात अनेक तक्रारी येऊ लागल्या. आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशाल अग्रवाल याला अटक केली. परंतु या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ही गुप्तता नेमकी का पाळली? याबाबत ही पोल१स बोलायला तयार नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. पुण्यातील पोर्ष कार अपघात प्रकरणातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला सोसायटी धारकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात हिंजवडी पोलिसांनी अटक केली होती. हिंजवडी पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक करत त्याची चौकशी सुरू केली होती. त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपत आली आहे. त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
विशाल अग्रवाल याच्या अटकेबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्यामुळे नवीन चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. नेहमी एखादा छोट्या आरोपीस अटक केल्यानंतर त्याची माहिती पोलिस माध्यामांना देतात. परंतु चर्चेतील या बड्या आरोपीच्या अटकेची माहिती का लपवली? यासंदर्भातील गौडबंगाल काय? ही गुप्तता नेमकी का पाळली? याबाबत ही पोलिस बोलायला तयार नाही. यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
प्रसारमाध्यमांना का टाळले?
पिंपरी-चिंचवड पोलिस एरवी साधे एक पिस्तूल सापडले तरी याबाबतची प्रेस नोट जाहीर करून मीडियात बातमी येण्यासाठी धडपड करत असतात. स्वत:ची पाठ थोपटून घेतली जाते. परंतु, पोर्षं कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतल्यानंतरही याबाबतची माहिती पोलिसांनी मीडियात येऊ दिली नाही, याबाबत कमालीची गुप्तता पोलिसांनी का बाळगली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.