24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांची हजेरी

काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांची हजेरी

चंद्रहार पाटलांना निमंत्रणच नाही शिवसेना-काँग्रेसमध्ये पुन्हा वाद पेटला

सांगली : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात सांगलीच्या जागेवरून सुरू झालेला वाद मतदानानंतरही थांबायला तयार नाही. आता काँग्रेसने आयोजित केलेल्या स्रेहभोजनाला बंडखोर नेते विशाल पाटील यांनी उपस्थिती लावल्याने पुन्हा या दोन्ही पक्षांत संघर्ष पेटला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना निमंत्रणही देण्यात आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विशाल पाटील यांच्यासह सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. त्या स्नेहभोजनाला वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवलेले मूळचे काँग्रेसचे असलेले विशाल पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा जुंपली आहे. विशाल पाटील आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

चंद्रहार पाटील यांना निमंत्रण नाही
काँग्रेसचे शहराध्यक्ष सर्वांना स्नेहभोजन देतात, त्या स्नेहभोजनाला विशाल पाटील हजेरी लावतात. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण नाही याचा अर्थ सांगलीत काँग्रेसने अधिकृत गद्दारी केली आहे. याचा पुरावा हे स्नेहभोजन देत आहे. पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी; अन्यथा आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होणार नाही, हे आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. आमची पक्षातून हकालपट्टी झाली तर चालेल पण या काँग्रेसच्या नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही तोंड पाहू देणार नाही, असा इशारा विभुते यांनी दिला आहे.

नेत्यांसोबत बंद खोलीत चर्चा करावी : काँग्रेस
विभुते यांच्या इशा-यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पलटवार केला आहे. ज्यांना दीर्घपल्ल्याचे राजकारण करायचे असते, त्यांनी एका निवडणुकीवरून असे भाष्य करणे योग्य नाही. अजून पुढे अनेक निवडणुका आहेत, असे सूचक वक्तव्य करत त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांसोबत बंद खोलीत चर्चा करावी, असा सल्लाही काँग्रेस शहराध्यक्ष पाटील यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR