मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची जगभरात चर्चा सुरू आहे. अलेक्सी नवाल्नी यांच्या पत्नीने रशियावर संताप व्यक्त केला आहे. अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची बातमी खरी असेल तर पुतीन आणि त्यांच्या सरकारला, सहका-यांना त्याची शिक्षा नक्कीच मिळेल असे युलिया नवाल्नी यांनी इशारा दिला आहे. जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूला थेटपणे पुतीन यांना जबाबदार धरले आहे.
वीस वर्षाचा तुरुंगवास भोगणारे राजकीय विरोधक अलेक्सी नवाल्नी (४७) यांचा काल अतिसुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरुंगात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचे जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अलेक्सी नवाल्नी यांच्या पत्नीने पुतीन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये बोलताना युलिया यांना रडू कोसळले. रशियन सरकारकडून अलेक्सी यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही. ते नेहमीच खोटं बोलतात. परंतु ते जर खरे असेल तर पुतीन आणि त्यांचे सरकार आणि त्यांच्या मित्रांनी आमचा देश, आमचे कुटुंब आणि पतीचा जो काही छळ केला, त्यावर उत्तर द्यावे लागेल आणि तो दिवस लवकरच येईल. नवाल्नी यांच्या पत्नीने संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला रशियाच्या ‘राक्षसी सरकार’ विरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले.
अलेक्सी नवाल्नी यांची हत्याच
रशियाचे शांततेचे नोबेल सन्मान विजेते दिमित्री मुरातोव्ह यांनी नवाल्नी यांचा मृत्यू ही ‘हत्या’ असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून नवाल्नी यांचा मानसिक छळ केला जात होता आणि त्यांच्यावर असे काही अत्याचार केले गेले की त्यांचे शरीर सहन करू शकत नव्हते, असे त्यांच्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितल्याचे मुरातोव्ह म्हणाले. रशियातील विजनवासातील नेते दिमित्री गुडकोव्ह यांनी सोशल मीडियावर अलेक्सी यांचा मृत्यू ही हत्याच आहे, असा आरोप केला.