मुंबई : आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. सयानी यांना आज सकाळी सहा वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते ९१ वर्षांचे होते. सयानी यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून, गुरुवारी, २२ फेब्रुवारीला सयानी यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आपल्या बहारदार आवाजात सूत्रसंचालन करून अमीन सयानी यांनी ‘बिनाका गीतमाला’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमामुळे देशभरात प्रसिध्दी मिळवली आणि ते देशभरातील घराघरांत पोहोचले. तर रेडिओवर ‘बहनों और भाईयों’ आवाज ऐकू आला की, श्रोते रेडिओ कानाजवळ धरत असत. अमीन सयानी यांनी आपल्या आवाजाने देशभरातीलच नाही तर जगभरातील श्रोत्यांना भुरळ घातली होती. त्यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम तब्बल पाच दशके श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नायकही अमीन सयानी यांच्या जादुई आवाजांचे चाहते होते.
सयानी यांच्या नकारामुळे अमिताभ चित्रपटाकडे वळले
दरम्यान अमीन सयानी यांच्याविषयी अनेक रंजक गोष्टी मनोरंजन क्षेत्रातून ऐकण्यात येतात. सूत्रांच्या मते,अमिताभ बच्चन हे उत्तर प्रदेशातून ज्यावेळी मुंबईत आले त्यावेळी त्यांनी रेडिओ निवेदक सयानी यांची भेट घेण्याचा खूप प्रयत्न केला. कारण बच्चन यांची रेडिओमध्ये निवेदकांचे काम करायची इच्छा होती. मात्र बच्चन यांच्या जड आवाजामुळे सयानी यांनी बच्चन यांना भेटण्यास नकार दिला होता. यामुळे अमिताभ यांची रेडिओवर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि बच्चन चित्रपट क्षेत्राकडे वळले.