मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता हस्तगत केली आहे, हे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करून पहावे.
फडणवीस यांच्याच पोलिसांनी याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे, त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघात मतचोरी कशी करण्यात आली हे काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. आता मतचोरीचा आणखी एक बॉम्ब राहुल गांधी यांनी फोडला आहे. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघाच्या मतदारयादीत कसा घोटाळा केला? हे आज उघड केले.
निवडणूक आयोग दुटप्पीपणा करत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरीवर स्पष्ट उत्तर न देता राजकीय पक्षाच्या नेत्याप्रमाणे बोलत आहेत. मतचोरी करून भाजपा व नरेंद्र मोदी यांना भारताचा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश करायचा आहे, असा गंभीर आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वारंवार केंद्र सरकारची पोलखोल केली असून नोटबंदी, कोरोना संकटावरही त्यांनी मोदी सरकारला धोक्याचा इशारा दिला होता पण मोदी सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागली आहे. जीएसटीमध्ये सुधारणा करा असे राहुल गांधी यांनी ८ वर्षांपूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि जीएसटीमध्ये त्यांना सुधारणा करावी लागली. जीएसटीमधील सुधारणा हा राहुल गांधी यांच्या दूरदृष्टी विचाराचा मोठा विजय असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस २२ सप्टेंबर रोजी राज्यभर दुकानदार, व्यापारी आस्थापना येथे पेढे वाटून साजरा करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांना सांगितले.