28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील ८ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान

महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान

मुंबई (प्रतिनिधी) : देशातील ८९ मतदारसंघांबरोबर महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी दुस-या टप्यात मतदान होणार आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या सर्वच मतदारसंघांत अत्यंत चुरशीची निवडणूक होत असून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह २०८ उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदान यंत्रात बंद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातील निवडणूक शांततेत व्हावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. ८ मतदारसंघांत जवळपास १६ हजार ५८९ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या आठही मतदारसंघांत संवेदनशील मतदारसंघांची संख्या लक्षणीय असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. परभणीत सर्वाधिक ४२ तर त्या खालोखाल नांदेडमध्ये ३१ मतदान केंद्र संवेदनशील आहे त्यामुळे या मतदान केंद्राच्या बाहेर विशेष सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. राज्यासह देशभरात सध्या उन्हाळा सुरू आहे. दुस-या टप्प्यात मतदारांनी जास्तीत जास्त मतदानात सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. प्रखर उन्हामुळे मतदार सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान मतदानासाठी फारसा बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे दिवस सरल्यानंतर संध्याकाळी मतदार मतदानाला बाहेर पडण्याचा अंदाज आहे. यामुळे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदाराला पुढे कितीही वेळ लागला तरी मतदान करण्याची मुभा असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR