गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथील वैनगंगा नदीत मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटली, यात सहा महिला वाहून गेल्या, त्यापैकी एका महिलेचा मृतदेह आढळून आला, पण पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. ही हृदयद्रावक घटना २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली.
गणपूर रै. व परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे. त्यामुळे अनेक जण वैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये-जा करतात. दरम्यान, २३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव पैलतीरी जात होती, पण ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली, त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या.
यावेळी नावाडी पाण्याबाहेर पोहून आला, त्याने एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. शेवटी तिचे प्रेत आढळले. ते पाण्याबाहेर काढले असून उर्वरित पाच महिलांना शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावपथकालाही पाचारण केले आहे.