नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत दुस-यांदा टी-२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. तब्बल १६ वर्ष ९ महिने पाच दिवसांनी भारताने दुस-यांदा या विजेतेपदाला गवसणी घातली. भारताच्या या विजयानंतर संघावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी हटके ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. दिल्ली पोलिसांनी भारतीय संघाच्या विजयानिमित्त ट्विटरवर एक पोस्ट केली जी सध्या चर्चेत आहे.
‘आपण सर्वांनी १६ वर्षे ९ महिने ५ दिवस (५२,७०,४०,००० सेकंद) भारताने आणखी एक कप जिंकण्यासाठी वाट पाहिली आहे. ट्रॅफिक सिग्नलवरही थोडा धीर धरूया. एकाद्या चांगल्या क्षणाची वाट पाहिली पाहिजे. काय म्हणता? हार्दिक अभिनंदन असे हटके ट्विट करत दिल्ली पोलिसांनी वाहनचालकांना खास संदेश वजा सल्ला दिला आहे.
दिल्ली पोलिसांच्या या ट्विटनंतर त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. एका यूजरने लिहिले, ‘व्वा, तुमची सोशल मीडिया टीम अप्रतिम आहे. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो हे खरे आहे. आणखी एका युजरने म्हटले, दिल्ली पोलिस, तुमचे ट्विट वेगळ्या स्तराचे आहेत. खुप छान. यापूर्वी भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळताना २००७ साली पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. टी२० वर्ल्ड कप दुस-यांदा जिंकणारा भारत तिसरा संघ ठरला. यापूर्वी असा कारनामा वेस्ट इंडीज आणि इंग्लंडने केला आहे. वेस्ट इंडीजने २०१२ आणि २०१६ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला. तसेच इंग्लंडने २००९ आणि २०२२ मध्ये टी२० वर्ल्ड कपला गवसणी घातली होती.