नवी दिल्ली : संसदेत मांडण्यापूर्वी वक्फ दुरुस्ती विधेयक जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीच्या गेल्या काही महिन्यांपासून बैठक सुरू आहेत. आजही या वक्फ विधेयकावरील जेपीसीची बैठक पार पडली. या जेपीसीच्या बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या २२ दुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या. तर विरोधकांच्या सर्व दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या. विरोधकांनी ४४ दुरुस्त्या मांडल्या होत्या, पण त्या सर्व फेटाळण्यात आल्या.
जेपीसीची पुढील बैठक २९ जानेवारी रोजी होणार आहे. आज झालेल्या जेपीसी बैठकीतही गोंधळ झाला. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गोंधळ घातला होता. दरम्यान, वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संसदीय समितीच्या सदस्यांनी विधेयकाच्या मसुद्यात ५७२ दुरुस्त्या सुचवल्या होत्या. भाजप आणि विरोधी सदस्यांनी विधेयकात दुरुस्त्या मांडल्या आहेत. मात्र, ज्या सदस्यांनी दुरुस्ती मांडली त्यांच्या यादीत भाजपच्या कोणत्याही मित्रपक्षाचे नाव समाविष्ट नाही.
वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ हे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ८ ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर केले होते. त्यानंतर ते संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले होते. वक्फ मालमत्तेच्या नियमन आणि व्यवस्थापनातील समस्या आणि आव्हाने दूर करण्यासाठी वक्फ कायदा, १९९५ मध्ये दुरुस्ती करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे.
५०० पानांचा अहवाल सादर करणार
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेपीसी आपला ५०० पानांचा अहवाल सादर करू शकते, असे म्हटले जात आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी बनवण्यात आलेल्या या समितीने दिल्लीत ३४ बैठका घेतल्या आहेत आणि अनेक राज्यांना भेटी दिल्या आहेत. यादरम्यान, समितीने दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, गुवाहाटी, भुवनेश्वर, कोलकाता, पाटणा आणि लखनौला भेटी दिली. समितीच्या २१ लोकसभा आणि १० राज्यसभेतील सदस्यांपैकी १३ सदस्य विरोधी पक्षांचे आहेत.