नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून बुधवार दि. २ एप्रिल रोजी विधेयक लोकसभेत आणि ३ एप्रिल रोजी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. दरम्यान वक्फ सुधारणा विधेयक मंजुरीसाठी भाजपने मोठी रणनिती आखल्याचे बोलल्या जात आहे.
एकीकडे एनडीएतील घटक पक्ष टीडीपीने उघडपणे या विधेयकाला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या जदयूनेही विधेयकाला फारसा विरोध केला नाही. भाजपने विरोधी पक्षातील अनेक पक्षांसोबत बैठक घेत पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कदाचित विरोधी पक्षातील काही पक्ष वक्फ विधेयकावरून सत्ताधारी भाजपसोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनुसार, भाजपने हे विधेयक ४८ तासांत संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्याची तयारी केली आहे.
एका सभागृहात हे विधेयक मंजूरही करण्यात येईल. त्यात २ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. त्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. २ एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले जाईल. सरकारने यासाठी ८ तासांच्या चर्चेचा अवधी निश्चित केला आहे. कामकाज सल्लागार समितीत या विधेयकावर त्याच दिवशी चर्चा होईल असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या विधेयकासाठी भाजप जास्त दिवस वाट पाहणार नाही. जर लोकसभेत २ एप्रिलला चर्चा पूर्ण झाली नाही तर पुढील दिवशीही चर्चा सुरू राहील.
विरोधकांचा विरोध कमी करत आणि घटक पक्षांना सोबत घेऊन विधेयक लोकसभेत पारीत करण्याचे भाजपचे टार्गेट आहे. लोकसभेत एनडीएला २९३ खासदारांचा पाठिंबा आहे. बहुमतासाठी २७२ हून अधिक खासदारांची गरज आहे. त्यामुळे लोकसभेत हे विधेयक सहजपणे मंजूर होईल अशी अपेक्षा भाजपला आहे.
४ एप्रिल शेवटचा दिवस
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ४ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे कमीत कमी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर व्हावे असे भाजपला वाटते. राज्यसभेत एनडीएकडे बहुमतासाठी काही मतांची गरज आहे. त्यांच्याकडे जवळपास ११५ खासदार आहेत. परंतु काही छोटे पक्ष, अपक्षांनासोबत घेत भाजप राज्यसभेतही विधेयक मंजूर करू शकते. जर राज्यसभेत वेळ कमी पडला तर पुढील अधिवेशनापर्यंत चर्चा टाळली जाऊ शकते.
सर्व खासदारांना व्हिप जारी
भाजपने त्यांच्या सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्यासाठी व्हिपही जारी केला आहे. लोकसभेत २ एप्रिल आणि राज्यसभेत ३ एप्रिलला पक्षाच्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत. पक्षाचे नेतृत्व विधेयकावर चर्चा करणार आहे. घटक पक्षांसोबतही सातत्याने बैठका होत आहेत.
कॅबिनेट बैठकीचे आयोजन
वक्फ सुधारणा विधेयकावरून सुरू असलेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ एप्रिलला कॅबिनेट बैठक बोलावली आहे. दुपारी १ वाजता ही बैठक होईल. त्याचवेळी लोकसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असेल. त्यामुळे उद्याच्या कॅबिनेट बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.