पुणे : राज्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवार असा सलग तीन दिवस चांगला पाऊस झाला. अनेक ठिकाणी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. तर पुणे शहरात १३१ तर पिंपरी-चिंचवड भागात १३५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे गुरुवारीदेखील हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे रात्री उशिरा राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. मात्र दुपारी २ ते रात्रीपर्यंत अत्यंत कमी वेगाने संततधार पाऊस झाला. पावसाचा जोर ओसरल्यामुळे भीतीने घाबरलेल्या सखल भागात राहर्णाया नागरिकांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकला.
शहरात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीने गुरुवारी २६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास प्रसारमाध्यमांना देण्यात आली. पंतप्रधानांची सभा शहराच्या मध्यवस्तीत स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होती. मात्र, तेथे चिखल तयार झाला होता. तसेच हवामान विभागाने गुरुवारीदेखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तत्काळ हे निर्णय घेतले. मात्र गुरुवारी पाऊस कमी झाला. जोर कमी झाल्याने दुपारी २ नंतर संततधार पावसाला सुरुवात झाली. मात्र शहरात ४.१ मिमी इतका सरासरी पाऊस झाला.
शहरात शुक्रवारी पावसाचा अंदाज देण्यात आला होता. येलो अलर्ट म्हणजे हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला होता तर २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत उघडीप राहील. मात्र १ ऑक्टोबरपासून पुन्हा परतीचा पाऊस सुरू होईल. हा पाऊस ७ ऑक्टोबरपर्यंत राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.