होबार्ट : वॉशिंग्टन सुंदरने बॅटिंगमध्ये दाखवलेला क्लास शो आणि जितेश शर्माने त्याला दिलेली साथ याच्या जोरावर भारतीय संघाने होबार्टच्या मैदानात विक्रमी विजयाची नोंद केली आहे. टॉस जिंकून भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टिम डेविड ७४ (३८) आणि मार्कस स्टॉयनिस ६४ (३९) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १८६ झाला करत टीम इंडियासमोर १८७ धावांचे टार्गेट सेट केले होते. होबार्टच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाने ठेवलेल्या विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या जोडीने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. शुबमन गिल १२ चेंडूत १५ धावा करून परतल्यावर अभिषेक शर्माने १६ चेंडूत २५ धावा करत मैदान सोडले. सूर्यकुमार यादवने ११ चेंडूत १ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २४ धावा करत या सामन्यात मोठा धमाका करण्याचे संकेत दिले. पण तो स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर फसला. तिलक वर्माने २६ चेंडूत २९ धावांची उपयुक्त खेळी केली.
पण ही विकेट पडल्यावर टीम इंडिया अडचणीत सापडते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण वॉशिंग्टन सुंदरनं संधीच सोने करत २३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार मारत फलंदाजीतील खास नजराणा पेश केला. त्याने केलेल्या नाबाद खेळीशिवाय संजू सॅमसनच्या जागी संधी मिळालेल्या जितेश शर्माने १३ चेंडूत २२ धावांची खेळी केली. त्याच्या भात्यातून विजयी धाव आली.

