दादर : बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणा-या एका खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ करत संबंधित खासगी कंपनीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ही कारवाई एसटी महामंडळाने केली आहे.
दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळाजवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असल्याचा प्रकार २१ मार्च रोजी घडला होता. संबंधित बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांनी याचे चित्रीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले.
याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिका-यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहने चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खासगी संस्थेला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.