लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण १७१ प्रकल्पामध्ये सध्या केवळ २८.५२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. ज्या प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आहे अशा प्रकल्पातून २५ टक्के पाणी उपसा करता येईल. ज्या प्रकल्पात ७५ टक्यापेक्षा कमी पाणी आहे तिथे पाणी पूर्णपणे राखीव राहिल. टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी आपल्याकडे असलेल्या टँकरची दुरुस्ती करुन घ्यावी, तसेच गावोगावचे हातपंप दुरुस्त करुन घ्यावेत, जिथे जिथे राखीव पाणी ठेवले आहे, त्याची सक्त रखवाली करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना दिली.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणांच्या टंचाई संदर्भातील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर (दूरदुश्य प्रणालीद्वारे), अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांच्यासह पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा यासह सर्व यंत्रणा प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण १७१ प्रकल्पात त्यात २ मोठे प्रकल्प, ८ मध्यम, १३४ लघु व २७ बंधारे आहेत. यापैकी ज्या प्रकल्पातील पाणीसाठा ७५ टक्या पेक्षा कमी असेल अशा प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याच्या प्रयोजनासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पातील पाण्याचा उपयोग जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार केवळ पिण्याच्या पाण्यासाठी होईल इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर करू नये असे सक्त आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी दिले.तसेच नागरिकांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यात एकही दमदार पाऊस पडला नाही. रिमझीम ते मध्यम स्वरुपाचाच पाऊस पडला. दोन पावसातील खंड मोठा राहिला. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाण्याची पातळी वाढलीच नाही. जिल्ह्यात काही तालुक्यांत पाऊस चांगला पडला परंतु, प्रकल्पांतील पाणीपातळीत फारशी वाढ झाली नाही. पावसातील खंडामुळे खरीपाच्या पिकांवरही त्याचा परिणाम झाला. सोयाबीन पिकाची वाढ खुटली. परिणामी उताराही घसरला. जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या एकूण १७१ प्रकल्पामध्ये सध्या केवळ २८.५२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हा पाणीसाठा आता केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.