वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेत येऊन ३ महिने होत नाही, तोच त्यांच्याविरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ट्रम्प यांच्यासह अब्जाधीश एलन मस्क यांच्याविरोधात अमेरिकेत जोरदार आंदोलन सुरू झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे आणि एलन मस्कचा सरकारमध्ये वाढता प्रभाव यामुळे आंदोलकांमध्ये रोष आहे. अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. लाखो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
या आंदोलनाला हँड्स ऑफ असे नाव देण्यात आले असून, या मोहिमेतून देशभरात तब्बल १४०० ठिकाणी निदर्शने केली. यामध्ये लाखो नागरिक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, वकील संघटना यांच्यासह तब्बल १५० पेक्षा जास्त संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. अमेरिकेच्या सत्तेवर अब्जाधिशांनी कब्जा केला आहे. त्यामुळे त्याविरोधात आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. सरकारी नोक-यांमध्ये कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार, टॅरिफ धोरण या गोष्टींविरोधात अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणा-या कर्मचा-यांमध्ये मोठी कपात करण्यात आली. विशेष म्हणजे या निर्णयामुळे गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य, मानवी सेवा अशा विविध विभागातील कर्मचा-यांवर बेरोजगारीची कु-हाड पडली. त्यामुळे संतापलेले अमेरिकेचे नागरिक हे रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनात जवळपास ६ लाख नागरिकांनी सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. काही निदर्शने ही लंडन आणि पॅरिससारख्या शहरांत झाली. विशेष म्हणजे भारताविरोधात भूमिका मांडणा-या इल्हान उमर यांनीदेखील या आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली तर डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार जेमी रास्किन यांनी तर ट्रम्प यांच्या सत्तेला हुकूमशाही म्हटले.
ट्रम्प, मस्क यांच्या मनमानीचा निषेध
आंदोलकांच्या हातात हँड्स ऑफ असे लिहिलेले पोस्टर आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, त्याचा नागरिकांनी निषेध नोंदवला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर आंदोलकांनी चिंता व्यक्त केली. ट्रम्प जगाला जागतिक मंदीच्या दिशेला ढकलत आहेत, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
आंदोलकांच्या मागण्या
अमेरिकेतील आंदोलकांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. पहिली म्हणजे अब्जाधिशांनी जो सत्तेवर कब्जा केला त्याला सोडावे, तसेच त्यांच्यापासून केला जाणारा भ्रष्टाचार रोखावा. दुसरी मागणी मेडिकेड आणि सोशल सिक्युरिटीसारख्या अत्यावश्यक कार्यक्रमांसाठी फेडरल फंडातील कपात थांबवणे आणि तिसरी मागणी ही ट्रान्सजेंडर आणि इतर समुदायावर होणारे हल्ले थांबवावेत अशा आंदोलकांनी मागण्या केल्या आहेत.