मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून मुनगंटीवार आपल्याच सरकारला खडेबोल सुनावताना दिसले. सोमवारीही मुनगंटीवारांनी आमदारांना बोलण्यास संधी दिली जात नसल्याच्या मुद्यावरून आक्रमक होत सरकारला चिमटे काढले. घरी खायला नाहीये म्हणून इथे येत नाही आम्ही असे मुनगंटीवार म्हणाले.
झाले असे विधानसभेतील चर्चांमध्ये महत्त्वाच्या नेत्यांना बोलण्यासाठी जास्त वेळ दिला जातो. त्यामुळे नवीन निवडून आलेल्या किंवा इतर फारशा चर्चेत नसलेल्या आमदारांना विषयांवर बोलण्याची संधी मिळत नाही. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले. काही आमदार आपले प्रश्न मांडण्यासाठी सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत थांबतात, पण त्यांना संधी दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. याच मुद्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी खडेबोल सुनावले.
सुधीर मुनगंटीवार विधानसभेत काय बोलले?
विधानसभेत बोलताना मुनगंटीवार तालिका अध्यक्षांना म्हणाले, अर्धा तास चर्चा जर घ्यायची नसेल, तर स्पष्टपणे सांगा ना. बसवून ठेवल्याने… कारण नसताना कामकाजात तीन-तीन तास बसवून ठेवायचे आणि मग सांगायचे अर्धा तास नाहीये.
अर्धा तास चर्चा घेणार आहात की नाही?
चर्चा घेणार असाल, तर त्या खुर्चीवरून सत्यमेव जयते. त्या खुर्चीवरून (विधानसभा अध्यक्षांची खुर्ची) पुन्हा असत्य माहिती येऊ नये. मग रात्री एक वाजेपर्यंत बसू. पण, रात्री नऊ वाजता घाई घाईत सांगायचे असे म्हणत मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली.
इथे काय दोन हजार भत्ता घ्यायचा
उपरोधिक सूरात मुनगंटीवार म्हणाले एकतर विधानभवनाचे नाव बदला, तर तेही बदलत नाहीत. आता कायद्यावर तर चर्चाच राहिली नाही. शेवटी आम्ही विषय मांडतो सर्वसामान्य, सार्वजनिक, दीन दुर्बल, शोषित, पीडित, गरीब, शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्यासाठी. इथे काही दोन हजार रुपये भत्ता घ्यायचा… घरी काही खायला नाही म्हणून इथे येत नाही आम्ही. कामकाज होणार असेल, तर ठीक आहे. नाहीतर चालतंय तर चालूद्या गाडी; तिथे काय अडचण आहे अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी आपला संताप व्यक्त केला.