मुंबई : इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राहता, मराठीमध्ये बोला, असा आग्रह धरणा-या एका मराठी तरुणालाच कान धरून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंब्रामध्ये ही घटना घडली असून तरुणाला जमावाने घेरले आणि त्याला जबरदस्ती माफी मागायला लावल्याचे समोर आलेल्या व्हीडीओमध्ये दिसत आहे.
एका फळविक्रेत्याजवळ तरुण गेला. त्याने कसे दिले म्हणून विचारले. त्यावर फळविक्रेत्याने हिंदीत उत्तर दिले. त्यावर तरुण म्हणाला की, पन्नास रुपये घे. फळविक्रेता म्हणाला की, मला मराठी येत नाही. त्यावर तरुण म्हणाला की, मराठी येत नाही, किती वर्ष झाली महाराष्ट्रात येऊन. महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठी आलीच पाहिजे. मी मुंब्रा बंद करून टाकेन असे तो तरुण म्हणाला.
यावरूनच वाद झाला. त्यानंतर त्या विक्रेत्याने गर्दी जमवली आणि मराठी तरुणाला दमदाटी सुरू केली. जमावाने त्याला घेरले. आम्हाला मराठी बोलता येत नाही. आम्ही मराठी बोलणार नाही काय करायचे ते कर, असे काही जण म्हणतात. व्हीडीओमध्ये दिसत आहे की, तरुण माफी मागत असताना काही जण म्हणतात की, आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल. आजूबाजूला गर्दी जमल्यानंतर तरुणाने माझ्याकडून चूक झाली मला माफ करा, अशी कान धरून माफी मागितली.
पण, तरीही वाद शमला नाही. त्यानंतर काही जणांनी त्याला मुंब्रा पोलिस ठाण्यात नेले. त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला असून मराठी तरुणाला माफी मागायला लावल्याबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.