27.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रआम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा

आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा

मुंबई : एकीकडे तलाठी भरतीचा महाघोटाळा चर्चेत आहे. त्याचवेळी बुधवारी पीएच.डी फेलोशिपचा पेपर फुटला. सारथी, बार्टी, महाज्योतीतर्फे आयोजित या परीक्षेत पुन्हा घोळ झाला. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार समोर आला.

पुणे येथील वडगावमध्ये असलेल्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर झेरॉक्स प्रत देण्यात आल्या तसेच प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? या शब्दांत घणाघात केला आहे.

रोहित पवार यांनी पीएच.डी फेलोशिपसाठी पेपर फुटल्यासंदर्भात जोरदार टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तलाठी भरतीतील गैरप्रकार ताजा असतानाच काल पुन्हा सारथी, बार्टी आणि महाज्योतीमार्फत पीएच.डी फेलोशिपसाठी घेण्यात येणा-या परीक्षेचाही पेपर फुटला. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा, ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पुढे म्हटले की, वारंवार होणा-या पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. त्यामुळं पेपरफुटीवर कडक कायदा करा. युवकांनी ही मागणी किती वेळा करायची? युवकांना जेव्हा तुम्ही सिरीयस होण्याचा सल्ला देता तेव्हा आपल्या जबाबदारीबाबत आपण सिरीयस होणार की नाही?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR